- ‘देवाची कृपा म्हणून आम्ही वाचू शकलो’..
- ‘माझा नातू ठीक आहे ना’?..
- कुंडमळा दुर्घटनेत प्रत्यक्षदर्शी नातेवाईक झाले हतबल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
इंदोरी (दि. १६ जून २०२५) :- इंद्रायणी नदीच्या छोट्या पुलावर माझे वडील गेले होते, त्यावेळी पर्यटकांची मोठी गर्दी झाली. नदीतील रांजणखळगे पाहण्यासाठी खूप पर्यटक आलेले होते. त्याचवेळी अचानक पूल कोसळला, त्यावेळी पुलावर माझे वडील होते. मी, माझी आई व बहीण आम्ही नदीपात्रातील खडकावर बसलेलो होतो, परंतु अचानक घटना घडल्याने मला काहीही करता आले नाही, असे पुण्यातील वानवडी येथील सुजित साठले सांगत होते.
कुंडमळा येथील पुलाच्या दुर्घटनेत साठले यांचे वडील पुलाच्या सांगाड्याखाली अडकले. त्यानंतर साठले प्रत्यक्ष घटना सांगत होते. ते म्हणाले की, मधला भाग वाहत्या पाण्यात पडला. मात्र, तेथे पोहोचणे शक्य नव्हते. प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत पुलाचा सांगाडा क्रेनने काढून घेण्याचे काम सुरू होते. माझे बाबा कुठे आहेत, काही कळत नाही.
कुंडमळा येथील गुलाब भेगडे म्हणाले की, मी व माझा भाऊ अशोक भेगडे घरी जाताना नदीच्या पुलावरून जात होतो. गर्दीतून वाट काढत मी कसाबसा पुढे गेलो अन् मागे मोठा आवाज झाला. पाहतो तर मागे पूल कोसळला होता. काहीजण पुलाच्या लोखंडी सांगाड्यात अडकले होते. आवाज झाल्यानंतर आमच्या येथील स्थानिक तरुणांनी कोसळलेल्या पुलावर अडकलेल्या ३०-३५ पर्यटकांना बाहेर काढले. यातील अनेकजण जखमी झालेले होते. मोठा आक्रोश होत होता. माझा भाऊ अशोक भेगडे हादेखील मागे गर्दीत अडकला होता.
कोसळलेल्या पुलाच्या लोखंडामुळे त्याच्याही पायाला मोठी दुखापत झालेली असून मी त्याला घेऊन उपचार करण्यासाठी तळेगावला खासगी रुग्णालयात आलो आहे. आमचे नशीब बलवत्तर, देवाची कृपा म्हणून आम्ही वाचू शकलो. तर दुसरीकडे ‘अहो… आमचा नातू कुठे आहे, तो कसा आहे, कोणी तरी आम्हाला सांगा ना, कोणीच आम्हाला काही का सांगत नाहीत..?’, असा प्रश्न विचारून मोहिनी कदम यांनी हृदय पिळवटून टाकणारा हंबरडा फोडला. त्यात मोहिनी यांची मुलगी शमिका या देखील जखमी झाल्या.
मोहिनी कदम यांची मुलगी शमिका ही पती रोहित माने आणि त्यांचा पाच वर्षीय मुलगा विहान यांच्यासोबत रविवारी कुंडमळा येथे आले होते. त्यावेळी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत शमिका गंभीर जखमी झाल्या. त्यांना लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या दुर्घटनेबाबत काही परिचितांनी घरी कळवले. माहिती मिळताच मोहिनी कदम आणि संजय कदम यांनी कुंडमळा येथे धाव घेतली. मात्र, त्यांची मुलगी शमिका, नातू विहान आणि जावई रोहित हे त्यांना दिसून आले नाहीत. त्यामुळे त्यांची चिंता वाढली. मोहिनी कदम यांनी जावई रोहित माने यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
त्याबाबत त्या म्हणाल्या की, जावयांच्या फोनवरून कोणीतरी कॉल घेत आहे. मात्र, समोरून कोणीही बोलत नाही. कोणी काहीच माहिती देत नाही, आम्हाला कोणीतरी सांगा ना ते कसे असतील, माझा नातू ठीक आहे ना? असे म्हणत मोहिनी कदम यांना अश्रू अनावर झाले. मोहिनी कदम यांची मुलगी शमिका ही रुग्णालयात दाखल असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती मिळताच कदम यांनी रुग्णालयात धाव घेतली. मात्र, तेथेही त्यांचा नातू त्यांना दिसून आला नाही.











