- महापालिकेच्या शाळांत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२५) :- आपल्या महानगरपालिका शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये अपार क्षमता आहे. त्या क्षमतांना योग्य दिशा देणे ही शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. त्यांना दर्जेदार शिक्षण, योग्य मूल्ये आणि मार्गदर्शन मिळाले पाहिजे. महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड गुणवत्ता आहे, आणि वेळोवेळी त्यांनी ती सिद्ध देखील केली आहे.” काळभोर नगर येथील महापालिकेचा माजी विद्यार्थी म्हणून आज याच शाळेत कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेणे ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. असे प्रतिपादन विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांनी केले.
थेरगाव येथील शाळेतील कार्यक्रमात बोलताना विधान परिषद सदस्य उमा खापरे यांनी शिक्षक वर्ग हे मातीच्या गोळ्याला आकार देणारे शिल्पकार आहेत. त्यांच्या मेहनतीमुळेच विद्यार्थी घडतात. महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेला हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ स्वागतपर नाही तर नव्या शैक्षणिक वर्षात आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा देणारा असाच आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे आज या शाळेला भेट देता आली, ही आमच्या सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे,असे प्रतिपादन केले.
पी.एम.श्री. पिंपरी चिंचवड मनपा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा म्हेत्रेवाडी क्र. ९२ या शाळेमध्ये आज शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या दिवशी
विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव आयुक्त शेखर सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला. आयुक्त सिंह यांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करीत त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच शाळेतील इनोवेशन लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
पिंपळे निळख येथील महापालिकेच्या शाळेत अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांचा निनाद करीत अतिरिक्त आयुक्तांचे स्वागत केले. त्यानंतर जांभळे पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पी.एम.श्री. पिंपरी चिंचवड मनपा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा म्हेत्रेवाडी क्र. ९२ येथील कार्यक्रमासाठी पर्यवेक्षिका अनिता रोडगे, मंदाकिनी गोसावी, शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल मोरे, डी.बी.टी. बँकिंग पार्टनर बँक ऑफ महाराष्ट्रचे क्षेत्रीय व्यवस्थापक बचेंद्र मलिक, डी.बी.टी. पुरवठादार सनराज प्रिंटपॅकचे राजेश नहार आदी उपस्थित होते. भोसरी इंग्लिश स्कूल येथील कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका विनिता डीसूझा व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.