न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२५) :- गेल्या काही महिन्यांपासून दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा वारंवार सुरू आहेत. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते यासंदर्भात सकारात्मक प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात. मात्र एकीकडे या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पुतण्या अजित पवार हे काका शरद पवारांना त्यांच्या होमपीचवरच जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी २५ माजी नगरसेवक सोबत घेऊन अजित पवारांचे तत्कालीन शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला होता. मात्र, भोसरी विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने अजित गव्हाणे यांनी आता अजित पवारांशी जवळीक वाढविली. त्यांची नुकतीच भेट घेतल्यानंतर ते लवकरच स्वगृही परतणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा मंगळवारी (दि. १७) भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या मेळाव्यात अजित गव्हाणे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच अजित गव्हाणे यांच्यासोबत वीस ते पंचवीस माजी नगरसेवक राष्ट्रवादीत पुन्हा परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी अजित गव्हाणे यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर गव्हाणे पुन्हा स्वगृही परतणार असल्याचा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावर प्रतिक्रिया देताना अजित गव्हाणे म्हणाले, ‘शहरातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात चर्चा झाली, टीपी स्कीम संदर्भात देखील अजित दादांसोबत चर्चा झाली मात्र पक्षप्रवेशाबद्दल आमच्यात काही चर्चा झाली नाही. त्यांसदर्भात पुढे योग्य तो निर्णय घेऊ’.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये केवळ दोन नगरसेवक हे शरद पवार यांच्यासोबत राहिले होते तर उरलेले सर्व नगरसेवकांनी अजित पवार यांची साथ दिली होती. मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटाचे शहर अध्यक्ष असणारे अजित गव्हाणे यांनी भोसरी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा बोलून दाखवली. युतीमध्ये ही जागा भाजपला सुटत असल्यामुळे अजित पवारांनी अजित गव्हाणे यांना तिकीट देण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर गव्हाणे यांनी थेट शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्यासोबत २५ नगरसेवकांनी सुद्धा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता.











