- महापालिकेच्या सहआयुक्तपदी उपायुक्त मनोज लोणकर यांची नियुक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23 जून 2025) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सहआयुक्तपदी उपायुक्त मनोज लोणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या एक महिन्यांपासून हे पद रिक्त होते. महापालिका अधिनियमानुसार वर्ग एकचे पद भरताना सरकारची पूर्वमंजुरी आवश्यक आहे. त्यानुसार, सेवा ज्येष्ठता, शिक्षण, अनुभव, सेवा पुस्तिका यांच्या आधारे महापालिका सेवेतील अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्याचे नमूद केले आहे.
सह आयुक्त पद भरण्यासाठी ३० मे २०२५ रोजी पदोन्नती समितीची सभा झाली. त्यात नियमानुसार उपायुक्त पदाच्या व्यक्तीच्या सेवा ज्येष्ठतेचा विचार करण्यात आला. त्यानुसार, मनोज लोणकर यांची महापालिका आयुक्त तथा शेखर सिंह यांच्या आदेशाने पदोन्नती झाल्याचे सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रकात म्हटले आहे.
चिखली-कुदळवाडीत काही दिवसांपुर्वी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली होती. उपायुक्त मनोज लोणकर यांनी त्यावेळी महत्वपूर्ण जबाबदारी निभावली होती. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर आयुक्त शेखर सिंह खुश आहेत. त्यामुळेच त्यांची महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली आहे, अशी कुजबूज महापालिका आवारात सुरू आहे.












