न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 23 जून 2025) :- ऑडिओ-व्हिडिओ क्लिपमध्ये आत्महत्येपूर्वीची भावना व्यक्त करत १८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. संजयकुमार विनोदकुमार राजपूत (१८, काळेवाडी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
संजयकुमारने आत्महत्या करण्यापूर्वी दोन व्हिडिओ आणि एक ऑडिओ क्लिप आपल्या आईला पाठवली होती. या क्लिपमध्ये त्याने बहिणींची जबाबदारी घेण्याची आई-वडिलांना विनंती केली आहे. माझ्या आईवडिलांना एवढंच सांगायचे आहे की, माझ्या बहिणींना कुणी त्रास देऊ नका… मला काही नकोय… फक्त माझ्या बहिणींची चिंता आहे. दोन्ही बहिणी सुरक्षित राहिल्या पाहिजेत. त्यांचे चांगले पालनपोषण व्हायला हवे. ही क्लिप ऐकून संजयकुमारच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजयकुमार हा देहुरोडजवळील विकासनगर भागात बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. १७ जून रोजी तो कामावर गेला, त्यानंतर घरी परतलाच नाही. त्याच्या बेपत्ता बाबतची तक्रार देहूरोड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. अखेर शनिवारी (दि. २१) त्याचा मृतदेह घोरावडेश्वर डोंगराजवळ आढळला. मृतदेहाजवळ विषाची बाटलीही सापडली आहे. तपास देहूरोड करत आहेत.












