न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. २५ मे २०१९) :- लोकसभा निवडणुकीत राज्यात मनसेने आपला उमेदवार उभा केलेला नव्हता. महायुतीच्या विरोधात महाआघाडीला त्यांनी पाठींबा दर्शविला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ ने भाजपची पोलखेल व विरोधात मोठी राळ उडवून दिली होती. तरीही भाजप राज्यासह देशातही प्रचंड बहुमताने सत्तेवर आली. त्यामुळे मनसे पदाधिकारी उपाध्यक्ष, विभागाध्यक्ष, उपविभागाध्यक्ष, शाखाध्यक्ष, गटाध्यक्ष व कार्यकर्ते यांनी खचून न जाता नव्या उमेदीने तयारीस लागावे, असा आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते व प्रवक्ते अविनाश अभ्यंकर यांनी राज्यातील मनसैनिकांना दिला आहे.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकांचे निकाल लागले, भारतीय जनता पक्ष आधीपेक्षा जास्त संख्येने पुन्हा सत्तेत विराजमान होत आहे. देशातील ३९% लोकांची मतं भाजपच्या बाजूने आहेत, त्यामुळे सरकार कोणी स्थापन करावं हा जनादेश भाजपच्या बाजूने आहे, हे आपण पण अमान्य करणार नाही.
पण देशातील उरलेली जनता ह्या निर्णयाच्या विरोधात आहे हे देखील दुर्लक्षून कसं चालेल?
गेली ४ वर्ष आणि अगदी आत्ता संपूर्ण लोकसभेच्या प्रचाराच्या काळात देखील पक्षाचा एकही उमेदवार रिंगणात नसताना देखील मा. राजसाहेब हे सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेल्यांचा आवाज बनले होते. त्यामुळे सत्तधाऱ्यांच्या विरोधातील लढाईत आपण एक महत्वाचा आवाज होतो आणि राहू हे विसरू नका.
निकालानंतर मला तुमच्यातील अनेकांचे फोन्स आले, मेसेजेस आले, अनेकांच्या स्वरात मला कुठेतरी काळजीची झाक जाणवली.
पण ह्यावर मी तुम्हाला मा. राजसाहेबांच्या वतीने सांगेन की आपली लढाई ही विचारांची लढाई आहे, आणि ही लढाई सोपी नसते. ह्यात यश हे काहीसं उशिराच येतं पण ते दीर्घकाळ टिकतं.
निकालांचं परीक्षण करताना विजयी उमेदवाराला किती मतं मिळाली हे आपण बघतो पण किती लोकांनी त्या उमेदवाराच्या, त्या विचारधारेच्या विरोधात मतदान केलंय हे आपण बघत नाही. हे आपल्याला बघावं लागेल कारण हा जनसमूह पण तितकाच मोठा आहे आणि आता तो आपल्याकडे आता अधिक अपेक्षेने बघतोय.
आपल्याला दुसऱ्याची रेष लहान करायची नाहीये तर आपली रेष मोठी करायची आहे आणि म्हणून मनातील सर्व शंका झटकून टाकूया आणि कामाला लागूया. आपण ‘महाराष्ट्र’ सैनिक आहोत, महाराष्ट्रातील जनतेच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत आणि म्हणून ज्या राज्याचे आपण सैनिक आहोत त्या राज्यासाठी, तिथल्या प्रश्नांसाठी, तिथल्या मातीसाठी, माणसांसाठी आपण पुन्हा कामाला लागूया.











