- घरातून निघून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा प्राधिकरण सुरक्षा समितीच्या पोलीस मित्रांच्या मदतीमुळे सुखरूपरित्या शोध
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०१९) :- मे महिन्याच्या सुरुवातीपासून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे स्वयंसेवक, विशेष पोलीस अधिकारी, पोलीस मित्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये जागते रहो या सामाजिक सुरक्षा उपक्रमांतर्गत रात्रगस्त मोहीम राबवित आहेत. रात्री ११.०० वाजेपासून पहाटे ५.०० वाजेपर्यंत समितीचे विभागीय सदस्य एसपीओ, पोलीस मित्र समिती अध्यक्ष विजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली अर्चना घाळी दाभोळकर, विजय मुनोत, जयेंद्र मकवाना, जयप्रकाश शिंदे, अँड विद्या शिंदे, विशाल शेवाळे, नितीन मांडवे, समीर चिले, तेजस सापरिया, अजय घाडी, राजेश बाबर, सतीश मांडवे, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, अमोल कानु, अमित डांगे हे प्रमुख चौकांमध्ये कार्यरत आहेत.
शनिवार दिनांक २५/०५/२०१९ रोजी मध्यरात्री ३.०० वाजेच्या सुमारास रात्रगस्त सुरू असताना दोन अल्पवयीन मुली व एक तरुण मोटारसायकल घेऊन संदिग्ध अवस्थेत प्राधिकरण सेक्टर २६ येथे फिरताना आढळले. बंदोबस्त करीत असलेल्या स्वयंसेवकांना पाहून त्यांनी तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, दक्ष एसपीओ अर्चना घाळी, अँड विद्या शिंदे, अमित डांगे, संतोष चव्हाण यांनी त्यांना भक्ती शक्ती चौक निगडी येथे थांबविले, त्यांनी महिला सदस्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे गस्तीवरील सदस्यांना त्याबाबत शंका आली. अधिक चौकशी केली असता यमुनानगर पोलीस चौकीमध्ये सदर तरुणी निघून गेल्याची तक्रार मुलीच्या आईने केली असल्याचे निष्पन्न झाले.
सदर मुलीच्या घरी पोलिस मित्र नितीन मांडवे व तेजस सापरिया यांनी निगडी श्रमीकनगर येथे मुलीच्या राहत्या घरी आई व पालकांना कळविले. पोलिस कर्मचाऱ्यांनी याबाबत कायदेशीर कारवाही करून त्या मुलीस आईच्या ताब्यात दिले. १३ मे २०१९ पासून मुलीचे पालक नातेवाईक हे मुलीचा शोध घेत होते. अखेर २४ मे रोजी दुपारी मुलीच्या आईने यमुनानगर पोलीस चौकी येथे मुलगी निघून गेल्याची तक्रार दाखल केली. आणि दुसऱ्याच दिवशी पोलिस मित्रांच्या शोधमोहिमेमुळे सापडलेल्या मुलीस समोर बघून मात्र आईस अश्रू अनावर झाले. त्या मातेने सर्व पोलीस मित्राचे आभार मानले.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,”तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या मुलींचे घरातून निघून जाण्याचे प्रमाण शहरात वाढले आहे. उपनगरातील स्थिती तर गंभीर आहे. समाजामध्ये अश्या घटनांमध्ये वाढ होणे धोक्याची घंटा आहे. ‘ती’ ची अशी ही विदारक मानसिक अवस्था का निर्माण होते. याचा आता सारासार अभ्यास होणे आवश्यक आहे. मुले घरातून निघून जाण्याचा वाढता आलेख सामाजिक असुरक्षेची नांदी असून वेळीच ह्यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला सुरक्षा विभाग यांनी याबाबत तातडीने उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.”











