न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बीड (दि. १८ जुलै २०२५) :- परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणात त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना अतिशय गंभीर आरोप केले. धनंजय मुंडे यांच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला. त्यावेळी वाल्मीक कराड हाच सर्व कारभार पाहत होता, असा दावा करत त्यांचीही चौकशी व्हायला हवी, अशी मागणी ज्ञानेश्वरी यांनी केली आहे. संतोष देशमुख प्रकरणानंतर महादेव मुंडे खून प्रकरणातही धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांच्यावर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.
महादेव मुंडे यांच्या खुनाला २० महिने उलटले आहेत. यात न्याय न मिळाल्याने बीड येथील पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयासमोरच पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली होती. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्या सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक झालेली नसून आता हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणात आ. धनंजय मुंडे यांचा फोन न लागल्याने स्वीय सहायक प्रशांत जोशी यांच्याशी संपर्क केला, त्यांनी आपण सोबत नसल्याचे सांगितले. त्यामुळे बाजू समजली नाही.जर एका महिन्यात न्याय मिळाला नाही, तर मी पुन्हा आत्महत्येचा प्रयत्न करू शकते. मुलांच्या मनातील संशय, खुन्यांना पकडण्यासाठी तातडीने न्याय मिळण्याची मागणी ज्ञानेश्वरी यांनी केली. तसेच मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या संभाषणाचीही ज्ञानेश्वरी यांनी आठवण करून दिली.
धनंजय मुंडेंच्या अडचणींत वाढ..
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचे उघड झाले, तर आ. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले. आता महादेव मुंडे खून प्रकरणातही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आ. मुंडे यांच्यावर आरोप केल्याने खळबळ उडाली आहे.












