- चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालयाला सपत्नीक दिली भेट, प्रलंबित कामांचा घेतला आढावा
- न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २१ एप्रिल २०२६) :- क्रांतिवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करण्यात येईल. ही वास्तू प्रत्येकाला देशप्रेमाची प्रेरणा देणारी ठरेल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्नी डॉ. आरती सूर्यवंशी यांच्यासह अक्षय्य तृतीया तसेच नुकत्याच झालेल्या क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या १२८ व्या स्मृतिदिनानिमित्त चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय ‘क्रांतितीर्थ’ येथे भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे, कार्यवाह ॲड. सतीश गोरडे, अतुल आडे, महापालिका उपायुक्त पंकज पाटील तसेच थर्ड आय स्टुडिओच्या मैथिली कुलकर्णी उपस्थित होते.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यावेळी म्हणाले, ‘अक्षय्य तृतीया आणि नुकत्याच झालेल्या क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिदिन (१८ एप्रिल) निमित्त क्रांतितीर्थाला सपत्नीक भेट देण्याचा योग आला. एका प्रेरणादायी, क्रांतिकारी, राष्ट्रप्रेमी कुटुंबाच्या वाड्याला पाहून मन भारावून गेले. लहानपणी क्रांतिवीर चापेकर बंधू यांच्या बलिदानाचा जाज्वल्य इतिहास ऐकला होता, तो संग्रहालयाच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभवता आला. या वास्तूमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देशप्रेमाची शिकवण मिळेल, अशी खात्री आहे,’ असे देखील त्यांनी सांगितले.
या संग्रहालयाचे उर्वरित काम तातडीने पूर्ण होईल, असा विश्वास आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. तसेच चापेकर वाडा येथील प्रलंबित कामाचा आढावा घेऊन उर्वरित कामे तात्काळ मार्गी लावण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.











