- जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रारूप प्रभाग रचना जाहीर..
- भावी ‘मेंबर’ लागले कामाला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वडगाव मावळ (दि. १८ जुलै २०२५) :- पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची तयारी सुरू असतानाच जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मावळ तालुक्याच्या प्रारूप प्रभाग रचनेची अधिकृत घोषणा केली आहे. या नव्या प्रारूपानुसार मावळमध्ये जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समितीचे दहा गण यापूर्वी प्रमाणेच कायम राहणार आहेत.
राज्यात बऱ्याच कालावधीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने प्रशासनाने हालचालींना वेग दिला आहे. काही वर्षांपूर्वी महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात मावळ तालुक्यात लोकसंख्येच्या वाढीच्या आधारे ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गण अशी सुधारित रचना करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०२२ पूर्वीची रचना पुन्हा लागू करण्यात आली आहे, त्यामुळे ही सुधारित रचना आता रद्द झाली आहे. या प्रत्येक गणामध्ये संबंधित ग्रामपंचायतींचा सविस्तर समावेश करण्यात आला असून, एकूण १०० हून अधिक गावांचा या निवडणुकीत सहभाग राहणार आहे.
गावनिहाय गणवाटपात काही गावांच्या सीमारेषा बदलण्यात आल्यामुळे स्थानिक नेतृत्वामध्ये नवीन गणिते, रणनीती, आणि नेतृत्व चाचण्यांची नवी लाट निर्माण झाली आहे. प्रारूप रचना प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील काही दिवसांमध्ये हरकती व सूचना मागवण्यात येणार असून, त्यानंतर अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाईल. मावळ तालुक्याचे प्रशासकीय व राजकीय दृष्टिकोनातून मध्यवर्ती व महत्त्वाचे शहर असलेले वडगाव मावळ आता नगरपंचायत म्हणून स्वतंत्र झाल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रभाग रचनेतून त्याला पूर्णपणे वगळण्यात आला आहे. यामुळे काही भागांत सध्याच्या गट-गण रचनेत मोठा फेरबदल झाला आहे.
प्रारूप रचनेनुसार गट व कंसात गण…
- टाकवे बु. गट (टाकवे बु. व वडेश्वर गण)
- इंदोरी गट (इंदोरी व वराळे गण)
- खडकाळे गट : (खडकाळा व कार्ला गण)
- कुसगाव बु. गट (कुसगाव बु. व काले गण),
- सोमाटणे गट: (सोमाटणे व चांदखेड गण)
गणनिहाय ग्रामपंचायतींचा समावेश पुढीलप्रमाणे…
- टाकवे बु.: माळेगाव बु.इंगळून, कशाळ, भोयरे, कोंडीवडे आ. मा., कल्हाट, निगडे, घोणशेत, साई, टाकवे बु., आंबळे
- वडेश्वर : खांड, डाहुली, कुसवली, वडेश्वर, शिरदे, खांडशी, सांगिसे, मुंढावरे, गोवित्री, उकसान, करंजगाव, कांग्रे नामा, नाणे.
- वराळे : नवलाख उंबरे, आंबी, वराळे, जांभूळ, साते
- इंदोरी: जांबवडे, सुदुंबरे, सुदवडी, इंदोरी, माळवाडी, नानोली तर्फे चाकण
- खडकाळे: कान्हे, चिखलसे, कुसगाव खु., खडकाळे, ताजे
- कार्ला : टाकवे खु., शिलाटणे, पाटण, मळवली, कार्ला, वेहेरगाव, वाकसई, डोंगरगाव, वरसोली, उदेवाडी, कुणे नामा
- कुसगाव बुद्रुक : कुरवंडे, कुसगाव बुद्रुक, आँढे खु, देवले, भाजे
- काले : लोहगड, आपटी, मोरवे, आंबेगाव, तुंग, केवरे, शिळींब, अजिवली, ठाकूरसाई, तिकोना, मळवंडी ठुले, कोथुर्णे, वारू, काले, महागाव, येळसे, कडधे, करूंज, धूगाव, शिबली.
- सोमाटणे : बौर, मळवंडी पमा, शिवणे, ओझर्डे, आढे, उर्से, परंदवडी, सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, सांगवडे.
- चांदखेड : दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, चांदखेड, धामणे, आढले खुर्द, आढले बुद्रुक, डोणे, येलघोल, ओवळे, दिवड, पुसाणे, पाचाने, कुसगाव पमा.












