- गुन्हे शाखा युनिट-४ कडून बांग्लादेशींवर हद्दपारीची मोठी कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २३ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड शहरात अनधिकृतपणे राहणाऱ्या ६ बांगलादेशी नागरिकांविरोधात गुन्हे शाखा, युनिट-४ यांनी मोठी कारवाई करत त्यांना ताब्यात घेऊन २२ जुलै २०२५ रोजी बांगलादेशमध्ये हद्दपार केले आहे.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी शहरात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार व सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४ चे वपोनि अरविंद पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
मोहम्मद उस्मान शिराजुन अली शेख (वय ३४, रा. सातखीरा), अब्दुला शागर मुल्ला (वय २५, रा. नराईल), मोबिन हारुन शेख (वय ३९, रा. नराईल), जाहांगिर बिलाल मुल्ला (वय ३५, रा. नराईल), मोहम्मद इलाहीन इलियास बिश्वास (वय २२, रा. नराईल), तोहिद मुस्लेम हसन शेख (वय २६, रा. जशोर) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
गुप्त माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हे ६ जण भुजबळ चौक, वाकड येथून मुंबईकडे जाणार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली. चौकशीत त्यांनी भारतातील कोणतेही वैध ओळखपत्र सादर केले नाही. अधिक तपासात ते बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाले.
सदर कारवाईत पोउपनि मयुरेश साळुंखे, सपोउपनि संजय गवारे व गुन्हे शाखेचे इतर अधिकारी, अंमलदार तसेच तांत्रिक विश्लेषकांचे मोलाचे योगदान लाभले.












