- अजित पवारांच्या राजीनाम्यासह पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- १८०० कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याविरोधात आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड शहराने तीव्र आंदोलन उभारून सत्ताधारी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर थेट हल्लाबोल केला आहे. या सरकारला ‘भूखंड माफिया, जमीन दलाल, भू-स्मगलर आणि जमीन लुटारूंचे सरकार’ अशी उपमा देत नागरिकांची लूट थांबवण्याची मागणी ‘आप’ने जोरदारपणे मांडली.
या घोटाळ्यात दोषी असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसह ‘आप’ने दोन प्रमुख मागण्या पुढे केल्या आहेत. पहिली म्हणजे अजित पवार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. दुसरी म्हणजे पार्थ पवार यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल करून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी.
शहराच्या विकासाची लूट आणि नागरिकांच्या कराच्या पैशांचा अपव्यय थांबवण्यासाठी ‘आप’ने लढा तीव्र करण्याचा निर्धार जाहीर केला आहे. ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे हे आंदोलन करण्यात आले असून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मागण्या पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नसल्याची घोषणा आम आदमी पार्टीने केली.












