- एससी, एसटी, ओबीसी व ओपन गटातील महिला राखीव जागांची उद्या आरक्षण सोडत..
- इच्छुकांची उत्सुकता शिगेला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक जानेवारी महिन्यात होणार असून त्यापूर्वी मंगळवारी (दि. ११) आरक्षण सोडत काढली जाणार आहे. कोणत्या प्रभागातील जागा राखीव होतील, याविषयी इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. महापालिकेत एकूण १२८ जागा असून शहरातील ३२ प्रभागांची रचना ६ ऑक्टोबरला अंतिम झाली आहे.
एससीसाठी २० आणि एसटीसाठी ३ जागा राखीव आहेत. यापैकी एससीतील १० व एसटीतील २ जागा महिला राखीव असतील. तसेच ओबीसी आणि ओपन गटातील निम्म्या जागा महिला राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे कोणत्या प्रभागांवर महिला आरक्षण लागू होणार, हे स्पष्ट होताच अनेक इच्छुकांचे राजकीय गणित बदलणार आहे. काही इच्छुकांनी महिला आरक्षण पडल्यास न लढण्याचा पर्याय स्वीकारला असून काही जणांनी शेजारील प्रभागावर लक्ष केंद्रित केले आहे.
सोडतीची प्रक्रिया चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात सकाळी अकराला सुरू होईल. महापालिका शाळेचे विद्यार्थी पारदर्शक ड्रममधून चिठ्ठ्या काढणार आहेत. या प्रक्रियेचे सोशल मीडियावर थेट प्रक्षेपणही होणार आहे. सोडतीसाठी सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी दिली.











