- चिंचवडच्या गृहरचना संस्थांच्या संवाद मेळाव्यात निळ्या पूररेषेसंदर्भात आश्वासन; नागरिकांना मोठा दिलासा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- चिंचवड मतदार संघातील निळ्या पूररेषेसंदर्भात राज्य शासन पातळीवर सर्वांगीण पाठपुरावा सुरू असून, नागरिकांनी नाहक चिंता करण्याची गरज नाही, असे आश्वासन आमदार शंकर जगताप यांनी दिले. चिंचवड परिसरातील अधिकृत बांधकामांच्या “एका स्क्वेअर फुटालाही” धक्का लागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रविवारी झालेल्या निळी पूररेषा बाधित गृहरचना संस्था व अपार्टमेंट प्रतिनिधींच्या संवाद मेळाव्यात आमदार जगताप बोलत होते. यावेळी सोसायटी पदाधिकारी तसेच आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
निळी व लाल पूररेषा या दोन्हींबाबत राज्य शासनाकडे अनेक मागण्या मांडल्या असून, पूररेषेतील अधिकृत बांधकामांना पुनर्विकास व अतिरिक्त टीडीआरची परवानगी देण्याची गरज असल्याचे जगताप यांनी सांगितले. चुकीच्या पद्धतीने दिलेल्या बांधकाम परवानग्यांबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
राज्य शासनाने या संदर्भात जलसंपदा, नगरविकास व पर्यावरण विभागातील तज्ज्ञ अधिकाऱ्यांची विशेष समिती स्थापन केली आहे. ही समिती पुनर्सर्वेक्षण करून नवी पूररेषा निश्चित करणार आहे. जोते पातळी, नदी प्रवाह आणि बांधकामांची स्थिरता यांचा तांत्रिक अभ्यास करण्यात येणार आहे. समितीचा अहवाल आल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, ज्यामुळे विद्यमान अधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाला मार्ग मोकळा होणार आहे.
या प्रक्रियेतून पिंपरी चिंचवड महापालिकेला सुमारे १२०० कोटी रुपयांचा महसूलही अपेक्षित असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले.
मेळाव्यातून नागरिकांना दिलासा…
आमदारांकडून मिळालेल्या माहितीतून मोठा दिलासा मिळाल्याची भावना सोसायटीधारकांनी व्यक्त केली. शासनस्तरावर सुरू असलेल्या मजबूत पाठपुराव्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल, असा विश्वास यावेळी नागरिकांनी व्यक्त केला.












