न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मोशी (दि. २४ जुलै २०२५) :- मोशी येथील पुणे-नाशिक हायवेवर २३ जुलै २०२५ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव टाटा कंपनीच्या बसने दुचाकीला धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला असून एकजण जखमी झाला आहे. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सुरेश राजमी कदम (वय ४३, रा. बो-हाडेवाडी, मोशी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात दुचाकीस्वार बबलु नंदजी गुप्ता (वय ३७) यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी आसाराम विठ्ठल बहीर (वय ५८, रा. तापकीरनगर, आळंदी) याने चालवलेली बस (क्र. MH 14 GD 4460) भरधाव वेगात होती. वाहतुकीचे नियम पाळले नसल्यामुळे टाटा बसने बाजूने चाललेल्या बजाज डिस्कव्हर (क्र. MH 14 DS 0236) दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेनंतर बबलू गुप्ता रस्त्यावर पडले असताना त्यांच्या डोक्यावरून बसचे मागील चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.
अपघातात फिर्यादी सुरेश कदम यांनाही खांदा, पाय आणि गुडघ्याला दुखापत झाली असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे.
या घटनेत भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(ए), १०६ व मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी अजूनही फरार असून पोउपनि इंगळे अधिक तपास करत आहेत.












