- कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २४ जुलै २०२५) :- चाकणमधील एका बांधकाम साईटवर काम करताना मजुराचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात बाळू बाजीराव वाणी (वय ४७, रा. सिल्वाना कॉन्टी, आळंदी) आणि सिताराम अग्रवाल (पत्ता अज्ञात) या दोघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०५ व ३ (५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सनत रामलाल यादव (वय ३८, रा. मूळगाव बैकोनी ठाणा, छत्तीसगड; सध्या लेबर कॅम्प, चाकण) यांचा भाऊ २२ जुलै रोजी पहाटे १.३० वाजता चाकणमधील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर प्लास्टरसाठी बांधलेले बंबूचे पहाड सोडत असताना तोल जाऊन खाली पडला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी कोणतीही बांधकाम सुरक्षा साधने उपलब्ध नव्हती. ठेकेदाराने सुरक्षेच्या उपाययोजना न करता काम सुरू ठेवले होते, हे मयताच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. आरोपी बाळू वाणी याला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सपोनि पवार करीत आहेत.












