- तरीही, वाहतूक पोलिसांची मुजोरी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २५ जुलै २०२५) :- चाकण शहरात मागील दोन महिन्यांपासून सम-विषम पार्किंग नियमाची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र, पुरेशा पार्किंग सुविधांअभावी वाहतूक पोलिसांकडून टोइंग व्हॅनद्वारे दुचाकी उचलून केली जाणारी कारवाई नागरिकांत नाराजीचा विषय ठरत आहे.
चाकण नगर परिषदेच्या हद्दीतील माणिक चौक ते मार्केटयार्ड रस्त्यावर आणि नाणेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीतही अशा कारवाया होत आहे. शहरात मागील दोन महिन्यांपासून सम-विषम पार्किंग नियमाची अंमलबजावणी सुरू आहे. चाकण नगर परिषदेने शहरात पुरेशा वाहनतळ सुविधा उपलब्ध कराव्यात आणि अन्यायकारक टोईंग कारवाई त्वरित थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. कोंडी टाळण्यासाठी सम-विषम पार्किंगचे फलक लावले, तरी पुरेशा वाहनतळ सुविधांचा अभाव आहे. यामुळे रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. दंड वाहनचालकांना चौकीत जाऊन भरावा लागतो
चाकण शहरातील माणिक चौक ते मार्केटयार्ड रस्त्यावर बाजारपेठेमुळे खरेदीदारांची वाहने रस्त्यालगत उभी केली जातात. वाहतूककोंडी टाळण्यासाठी सम-विषम पाकिंगचे फलक लावण्यात आले असले, तरी पुरेशा वाहनतळ सुविधांचा अभाव आहे. यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागतात. वाहतूक पोलिसांकडून नो-पाकिंग झोनमध्ये उभ्या असलेल्या दुचाकी टोईंग व्हॅनद्वारे उचलून तळेगाव चौकातील वाहतूक शाखेच्या चौकीत नेल्या जातात. तिथे वाहनचालकांना 750 रुपये दंड भरावा लागतो.
नाणेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीत सम-विषम पार्किंगचे फलक नसतानाही टोइंग व्हॅनद्वारे दुचाकी उचलल्या जात आहेत. तसेच, चाकण शहरात माणिक चौक ते श्री शिवाजी विद्यालय रस्त्यावर सम-विषम पार्किंगचे फलक असले, तरी इतर ठिकाणी असे फलक नसतानाही कारवाई केली जात आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, टोइंग व्हॅन रिकामी जाऊ नये, म्हणून दिसेल तिथे दुचाकी उचलल्या जातात. चारचाकी वाहनांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे.












