- परप्रांतीय पतीचा गळफास तर, पत्नीचा संशयास्पद मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२५) :- नवी सांगवीतील शिवनेरी कॉलनीत राहत्या घरात पतीने गळफास घेत आत्महत्या केली. तर, पत्नीचा मृतदेह भितीला टेकून बसलेल्या संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी (दि. २४) सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
मृत पतीचे नाव शाम जग्गू वाघेला (वय ५०) असून, पत्नीचे नाव राजश्री वाघेला (४५, रा. शिवनेरी कॉलनी नवी सांगवी) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघेला कुटुंब मूळचे गुजरातचे असून, सध्या नवी सांगवी येथे स्थायिक आहेत. दोघेही सध्या घरी एकटेच राहत होते. त्यांना श्वेता आणि स्नेहल अशा दोन विवाहीत मुली असून, एक नवी सांगवीत, तर स्नेहल पिंपळे सौदागर येथे राहते. राजश्री या पिंपरीतील स्कूलमध्ये शिक्षिका होत्या. तर, शाम वाघेला एका रिअल इस्टेट कार्यालयात नोकरी करीत होते.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार पती-पत्नीत वाद होत असल्याचे समोर आले आहे. बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. त्यानंतर राजश्री यांनी दोन्ही मुलींना फोन करून घटनेची माहिती दिली होती. गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मुलगी घरी आली. दरवाजा ठोठावला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला. घरात वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत आणि आई भितीला टेकून बसलेल्या मृतावस्थेत आढळून आली. राजश्री यांच्या तोंडातून रक्त येत होते. मात्र, शरीरावर कोणतेही मारहाणीचे वळ नव्हते. प्राथमिक तपासानंतर मृतदेह सांगवी पोलिसांनी शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले. तपास सांगवी पोलिस तपास करत आहेत.
शाम वाघेला यांनी गळफास घेऊन आत्महत्या हत्या केली आहे. तर, पत्नी राजश्री यांचा मृतदेह भिंतीला टेकून बसलेल्या अवस्थेत आढळून आला असून, त्यांच्या शरीरावर कोणतीही जखम दिसून आलेली नाही. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले असून, विषप्राशन आहे का? याबाबत अहवाल आल्यानंतर स्पष्टता येईल.
– संदीप आटोळे, पोलिस उपायुक्त, पिंपरी-चिंचवड












