न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बावधन (दि. २५ जुलै २०२५) :- पुण्यातील भुगाव येथील ३५ वर्षीय नोकरी करणाऱ्या महिलेची झिरोदा ट्रेडिंग अॅपमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने सुमारे ₹५२.३८ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बावधन पोलीस ठाण्यात रितिका देवी मोवा (मोबाइल नंबर ८०१९२७३४०६) आणि अन्य अज्ञात आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. ५ ऑक्टोबर २०२४ ते २२ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत ही फसवणूक ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली.
आरोपीने स्वतःचा “रितिका देवी” म्हणून परिचय दिला आणि फिर्यादी महिलेस झिरोदा ट्रेडिंग अॅपद्वारे गुंतवणुकीचे आमिष दाखवले. प्रारंभी काही रक्कमेवर चांगला परतावा देत विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर तब्बल ₹४७.३८ लाख गुंतवण्यास भाग पाडले.
परतावा मिळवण्यासाठी ₹५ लाख टॅक्स भरण्याचा दबाव टाकण्यात आला. टॅक्स भरल्यानंतरही रक्कम परत न देता, फिर्यादीची एकूण ₹५२,३८,९३३/- रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पवार तपास करत असून, आरोपी अद्याप मोकाट आहेत. पुढील तपास सुरू आहे.












