- नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण सध्या ८४.२८ टक्के भरले असून, पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर येवा वाढत आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी सध्या धरणाच्या सांडव्यावरून १५०० क्युसेक्स पाणी पवना नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात येत आहे.
याशिवाय, आज सायंकाळी ५:३० वाजता जलविद्युत केंद्रातून आणखी १००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे एकूण विसर्गाची मात्रा २५०० क्युसेक्स इतकी होणार आहे. पावसाच्या तीव्रतेनुसार हा विसर्ग अधिक किंवा कमी केला जाऊ शकतो.
पवना नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात न उतरण्याचे, तसेच पाण्याचे पंप, शेती अवजारे, जनावरे इत्यादी तत्काळ सुरक्षित ठिकाणी हलवावेत. सखल भागातील नागरिकांना वेळीच सावध करण्यात यावे. कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी व दक्षता घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्ष, खडकवासला पाटबंधारे विभाग यांनी केले आहे.












