न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. ३१ जुलै २०२५) :- तळेगाव दाभाडे येथे एका गाडीवर लिंबू, हळदी-कुंकू ठेवून जादूटोण्याचा प्रकार केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २९ जुलै २०२५ रोजी रात्री १० ते १०.३० दरम्यान घडली. सुहास बळीराम गरुड (वय ४९, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
फिर्यादी यांच्या मालकीच्या एमएच १४ जीवाय ३६२३ क्रमांकाच्या मास्ती एस-क्रॉस गाडीवर महिला आरोपीने पार्किंगच्या जागी येऊन एका कागदावर लिंबू ठेवून त्यावर हळदी-कुंकू टाकले. त्यामुळे फिर्यादीने जादूटोण्याचा संशय व्यक्त केला.
या घटनेनंतर महिला आरोपी (रा. तळेगाव दाभाडे) हिच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ च्या कलम ३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास मपोउपनि गावडे करत असून, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.












