- मात्र, भटकी कुत्री मोकाट; सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनात प्रवेशासाठी सामान्य नागरिकांना आयडी कार्ड, कामाचे स्वरूप याची माहिती देणे तसेच हेल्मेट सक्ती केली जात असतानाच, या मुख्य इमारतीत भटकी कुत्री बिनधास्तपणे वावरत असल्याने तीव्र संताप निर्माण झाला आहे.
भारतीय जनता पार्टीचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी या प्रकरणी आयुक्त शेखर सिंह यांच्यावर गंभीर आरोप करत महानगरपालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
त्यांनी सांगितले की, इमारतीच्या प्रवेशद्वारासह परिसरात १२ पेक्षा अधिक सुरक्षा रक्षक तैनात असूनही भटक्या कुत्र्यांना रोखण्यात अपयश आले आहे. दुसरीकडे नागरिकांना मात्र प्रवेशासाठी कडक अटी लादल्या जात आहेत.
सचिन काळभोर यांनी मागणी केली की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका इमारतीत शिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण न ठेवणाऱ्या सुरक्षा रक्षकांना त्वरित निलंबित करण्यात यावे. तसेच, शहरात एक ते दीड लाखांहून अधिक भटकी कुत्री आहेत. विधानसभा सभागृहातही याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित होऊनही प्रशासनाने योग्य ती उपाययोजना केली नसल्याचे त्यांनी सांगितले.
मेसेको कंपनीच्या खाजगी सुरक्षारक्षकांवर लाखो रुपये खर्च केला जात असूनही ही ढिसाळ सुरक्षा व्यवस्था नागरिकांना त्रासदायक ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना वेठीस धरून कुत्र्यांना मोकळीक देणे हे दुहेरी धोरण थांबवावे व भटक्या कुत्र्यांवर नियंत्रणासाठी तातडीने पथके तयार करून उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी सचिन काळभोर यांनी आयुक्तांकडे केली आहे.












