- ताथवडेमधील दुर्दैवी घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
ताथवडे (दि. ०२ ऑगस्ट २०२५) :- ताथवडे येथील एडन गार्डन सोसायटीच्या गेटवर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. या अपघातात केवळ तीन वर्षे सहा महिन्यांची चिमुकली शिवानी जगन दाभाडे हिचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अक्षय शांताराम चौधरी (वय २८, रा. यशविन सोसायटी, वाकड) याच्याविरुद्ध भा. न्या. संहिता कलम तसेच मोटार वाहन कायदा कलम अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
शिवानी ही आपल्या वडिलांसोबत सोसायटीच्या गेटजवळ असताना, आरोपीने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगात, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत चालवली आणि निष्काळजीपणे चालवलेल्या या वाहनाच्या धडकेत शिवानी गंभीर जखमी झाली. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
फिर्यादी जगन वामन दाभाडे (वय ५०, व्यवसाय हाऊसकिपिंग, रा. ताथवडे) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.
या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. तपास पो.उपनिरीक्षक ताकतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












