- बदलीचा कालावधी संपुनही कर्मचाऱ्यांना ‘लेखा’चा मोह सुटेना?..
- भ्रष्ट आणि दोषींवर आयुक्तांनी कारवाई करावी…
- राहुल कोल्हटकर यांची आयुक्तांकडे मागणी..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागातील एका कर्मचाऱ्याचा पैसे घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच अनेक वर्षांपासून एकाच पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तत्काळ बदल्या करण्यात याव्यात, अशी मागणी करदाता, सामान्य नागरिक राहुल कोल्हटकर यांनी आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, लेखा विभागात ठेकेदारांच्या देयकांबाबत आर्थिक व्यवहार होत असून, एकाही बिलासाठी पैसे घेतल्याशिवाय प्रक्रिया पुढे जात नाही. यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर आर्थिक हितसंबंध निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. महापालिकेतील भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाची वल्गन करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेला हा प्रकार काळिमा फासणारा आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतरही विभागप्रमुख किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही, ही बाब गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान शासन नियमांनुसार एकाच जागेवर तीन वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत राहता येत नाही. मात्र, लेखा विभागात अनेक अधिकारी, कर्मचारी, लिपिक, शिपाई हे अनेक वर्षांपासून याच विभागात काम करत असून, काहींच्या बदल्या रद्द करून त्यांना पुन्हा तिथेच पदोन्नती देण्यात आली आहे, असा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ चौकशी व कारवाई करावी, असे या निवेदनात कोल्हटकर यांनी म्हटले आहे.












