न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नाशिक (दि. ०४ ऑगस्ट २०२५) :- नाशिक शहरातील एका खासगी क्लासमध्ये बेंच पुढे घेण्यास सांगितले असता त्यास नकार दिल्याच्या कारणातून मनात राग धरून दोघा अल्पवयीन मुलांनी शनिवारी सायंकाळी क्लासच्या बाहेर एका १६ वर्षीय विद्यार्थ्याला एकटे गाठून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या मारहाणीत संबंधित विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून मारहाणीची ही बाब उघड झाली असून, सातपूर पोलिसांनी दोघा अल्पवयीनांना खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे.
मारहाण झालेला विद्यार्थी शनिवारी सायंकाळी रस्त्यात बेशुद्धावस्थेत पडलेला आढळून आला होता. त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले होते.
मृतदेहावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नव्हत्या. शवविच्छेदनात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याचे स्पष्ट झाले. तसेच खासगी क्लासच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांनी केली असता त्यामध्ये मुलांच्या घोळक्यातून दोघेजण त्यास लाथाबुक्क्यांनी मारताना दिसून आले. त्यानंतर तेथील पार्किंगमध्ये तो कोसळल्याचेही फुटेजमध्ये दिसते.












