न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सांगवी (दि. ०४ ऑगस्ट २०२५) :- अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला एक नागरिकाने ‘तीन वर्षाच्या बाळाला वरून फेकेल आणि मीदेखील आत्महत्या करेल’, अशी धमकी दिली.
ही घटना शनिवारी (दि. २ ऑगस्ट) सकाळी सातच्या सुमारास सांगवी येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजाराम साहेबराव लाड आणि नीलेश राजाराम लाड (रा. जुनी सांगवी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपअभियंता शाम गर्जे (वय ४०, रा. रहाटणी), यांनी याबाबत सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई करताना संशयितांनी विरोध दर्शवून पहिल्या मजल्यावर सर्व कुटुंबासह जाऊन दरवाजा बंद केला. त्यानंतर नीलेश लाड याने तीन वर्षांच्या मुलाला उचलून ‘बांधकाम पाडले तर बाळाला खाली फेकून देईन व मी सुद्धा आत्महत्या करेन,’ अशी धमकी दिली. तसेच शिवीगाळ व सरकारी कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे.












