- शिक्षण विभाग अलर्ट: चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. २७ ऑगस्ट २०२५) :- पिंपरीतील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स वसाहतीमधील डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित एच. ए. शाळेत घडलेल्या एका प्रकारामुळे पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
वार्षिक शुल्क बाकी असलेल्या काही विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर उभे करण्यात आल्याचे छायाचित्र पालकांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर झाल्यानंतर हा मुद्दा थेट सोशल मीडियावर पोहोचला. प्रकरण सार्वजनिक होताच सामाजिक संघटनांनी शाळेच्या पद्धतीवर आक्षेप घेतला आणि कारवाईची मागणी केली.
याची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण विभागाने चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती नेमली आहे. समितीच्या अहवालानंतर विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे पुढील कार्यवाही होणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी दिली.
दरम्यान, या घटनेबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका दर्शना कोरके यांनी स्पष्टीकरण दिले. “व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकलेल्या छायाचित्रामुळे काही पालकांमध्ये गैरसमज झाला. प्रत्यक्षात पालकांकडून शाळेकडे कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही. पालकांचे म्हणणे समजून घेतले जाईल,” असे त्या म्हणाल्या.













