- परिसरात दहशतीचे वातावरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे, (दि. २७ ऑगस्ट २०२५) :- तळेगाव दाभाडे रेल्वे स्टेशनलगतच्या तलावात पुन्हा एकदा मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ माजली आहे. सलग दोन दिवसांत या ठिकाणी दोन वेगवेगळे मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.
नवीन घटनेत आदेश उर्फ मंगेश प्रकाश बोराडे (वय २७, रा. वडगाव मावळ, मूळ लोणावळा) या तरुणाचा मृतदेह तलावात दिसून आला. दोन दिवसांपूर्वी याच तलावात २२ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला होता.
घटनास्थळी तळेगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक दाखल झाले. तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था व आपत्ती व्यवस्थापन टीमच्या निलेश गराडे, शुभम काकडे, गणेश गायकवाड, राजेंद्र बंडगे, राजू सय्यद, अनिश गराडे आदींनी मृतदेह बाहेर काढला.
सलग दोन दिवसांत एकाच ठिकाणी दोन मृतदेह मिळाल्याने परिसरात संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस याबाबत सखोल चौकशी करत आहेत.












