न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑगस्ट २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयाला नॅशनल बोर्ड ऑफ एग्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS), नवी दिल्ली तर्फे डीएनबी (जनरल मेडिसिन) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली आहे. २०२५ प्रवेश सत्राकरिता चार जागा मंजूर झाल्या असून यामुळे महापालिकेच्या आरोग्य सेवेला बळकटी मिळणार आहे.
यापूर्वी NBEMS तर्फे थेरगाव, आकुर्डी आणि भोसरी रुग्णालयांना पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी २२ जागांना मान्यता मिळाली होती, तर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात नॅशनल मेडिकल कौन्सिल मान्यताप्राप्त अभ्यासक्रम आधीपासूनच सुरू आहेत.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, “ही मान्यता पिंपरी चिंचवडसाठी ऐतिहासिक ठरली असून वैद्यकीय शिक्षण व संशोधनास चालना मिळेल.”
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे म्हणाले, “विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण मिळून रुग्णसेवा अधिक सक्षम होईल.”












