- निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी काटेकोर नियोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. निवडणूक व्यवस्थापन सुलभ व्हावे आणि आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी यासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी विविध नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
या अधिकाऱ्यांची जबाबदारी मतदान केंद्रांची व्यवस्था, कायदा-सुव्यवस्था राखणे, कर्मचारी व साहित्य व्यवस्थापन, ईव्हीएम हाताळणी, आयटी व कम्युनिकेशन प्लॅन, प्रचार नियंत्रण, तक्रार निवारण, मतमोजणी तसेच स्ट्राँग रुम व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रांसाठी निश्चित करण्यात आली आहे.
मुख्य अभियंता प्रमोद ओंबासे आणि कार्यकारी अभियंता महेश बरीदे यांची निवडणूक अधिकारी यांचे विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. तर उप आयुक्त संदीप खोत, सहायक आयुक्त मुकेश कोळप, सह आयुक्त मनोज लोणकर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
याशिवाय मतदान केंद्र व्यवस्थापनासाठी शहर अभियंता मकरंद निकम, वाहतूक नियंत्रणासाठी सह शहर अभियंता अनिल भालसाकळे, जनसंपर्क आणि स्वीप कार्यक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, निवडणूक खर्चासाठी मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, तसेच कर्मचारी मानधनासाठी वित्त अधिकारी प्रविण जैन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच टपाली मतपत्रिका, साहित्य व स्टेशनरी, परवाना विभाग, कायदेशीर सल्ला, आयटी व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, दिव्यांग मतदार मदत, कम्युनिकेशन प्लॅन अशा प्रत्येक क्षेत्रासाठी स्वतंत्र जबाबदार अधिकारी नेमण्यात आले आहेत. या नियुक्त्यांमुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील समन्वय व पारदर्शकता वाढेल, असा विश्वास प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केला आहे.










