- महायुतीतील घटक पक्ष बॅकफूटवर..
- शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षात संभ्रमाचे वातावरण?..
- सन २०१७ च्या निवडणुकीत असे होते बलाबल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभागरचना शुक्रवारी (दि. २४ ऑगस्ट) प्रसिद्ध करण्यात आली. चार सदस्यीय ३२ प्रभाग करण्यात आले असून ही प्रभागरचना सन २०१७ सारखीच आहे. त्यामध्ये काहीही बदल केला नसल्याने भाजपाला ही निवडणूक सोपी असणार आहे. २०१७ मध्ये याच प्रभाग रचनेच्या आधारे भाजपाने ७७ जागी यश मिळवत महापालिकेवर सत्ता मिळवली होती. आताही तशीच रचना असल्याने राष्ट्रवादी काँग्रेससह विरोधी पक्षांना ही निवडणूक अवघड जाणार आहे.
पिंपरी चिंचवड महापालिकेची १२ मार्च २०२२ रोजी मुदत संपली. त्यानंतर १३ मार्चपासून महापालिकेवर प्रशासकराज आहे. त्यापूर्वी महापालिकेवर भाजपाची सत्ता होती. दरम्यान, २०२२ साली राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता होती. राज्यातील महापालिका ताब्यात घेण्यासाठी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने तीन सदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याचा आदेश दिला होता. तसेच लोकसंख्या वाढीचा वेग लक्षात घेता पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये ११ नगरसेवक वाढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नगरसेवकांची संख्या १२८ वरून १३९ वर जाणार होती. तीन सदस्यीय पद्धतीने ४६ प्रभाग होणार होते. यामध्ये राष्ट्रावादी काँग्रेसने प्रभागरचनेत अप्रत्यक्षपणे लक्ष घातले होते. त्याचा परिणाम भाजपच्या अनेक नगरसेवकांचे प्रभाग फुटले होते. त्यामुळे भाजपासाठी निवडणूक अवघड होणार होती. मात्र, त्यानंतर राज्यातील सत्तेत बदल झाला. पुढे अजित पवारांची राष्ट्रवादी देखील सत्तेत सहभागी झाली.पुढे शासनाने प्रभागरचना चार सदस्यीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २०१७ नुसारच प्रभागरचना करण्यात आली आहे. ही प्रभागरचना भाजपसाठी अनुकूल असल्याने भाजपाने २०१७ साली तब्बल ७७ जागी यश मिळवले होते. तर राष्ट्रावादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला होता. आता पुन्हा त्याच प्रभागरचनेवर निवडणूक होणार असल्याने भाजपमध्ये खुशी आहे. तर राज्यातील सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मोठे प्रभाग कुणाच्या पथ्यावर ?
चार सदस्यीय प्रभागांमध्ये प्रभाग आकाराने आणि मतदारसंख्येच्या दृष्टीने मोठे होतात. प्रभाग मोठे झाल्यानंतर उमेदवार मोठ्या जनसंपर्काचा नेता असावा लागतो. शहरातील माजी नगरसेवकांचे कार्यक्षेत्र खूपच मर्यादित असल्याचे मागील निवडणुकीमध्येच दिसून आले होते. अशा परिस्थितीत निवडणूक उमेदवारांच्या चेहऱ्यावर नव्हे तर पक्षाच्या चिन्हावर लढली जाते. प्रभाग मोठे झाल्याने सर्वच उमेदवारांना प्रत्येक मतदारापर्यंत पोहचणे शक्य होत नाही. परंतु भाजपने आपल्या निवडणूक यंत्रणेची बांधणीच अशा पद्धतीने केली आहे की कोणतीही निवडणूक असली तरी मतदार यादीतील प्रत्येक पानावर काम करणारे कार्यकर्ते सज्ज असतात. गेल्या काही निवडणुका पाहता विरोधी पक्षांना हे शक्य झाले नसल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे.
तीन सदस्यीय पद्धतीने प्रभागरचना करताना तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कलाने तसेच राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांच्या सांगण्यानुसार प्रभागरचना केल्याचे आरोप झाले होते. तसेच तीन सदस्यीय पद्धतीने केलेली प्रभागरचना राष्ट्रवादी काँग्रेससाठी अनुकूल असल्याचे बोलले जात होते. तर, तीन सदस्यीय पद्धतीने निवडणूक झाल्यास भाजपसाठी खडतर होते. मात्र, आता २०१७ प्रमाणेच प्रभागरचना केल्याने भाजपासाठी सोपी, राष्ट्रवादी काँग्रेससाठी खडतर निवडणूक असणार आहे. तर उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना), काँग्रेस व इतर छोट्या पक्षांसाठी ही निवडणूक कठीण होणार आहे.
२०१७ साली कोणाला किती जागा ?…
- भाजपा – ७७
- राष्ट्रवादी काँग्रेस (एकसंघ) – ३६
- शिवसेना एकसंघ) – ०९
- महाराष्ट्र नवनिर्माण सेना – ०१
- अपक्ष – ०५
- एकूण – १२८










