आकुर्डीपर्यंत पिलर व पहिल्या ट्रॅकची उभारणी पूर्ण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी महत्त्वाकांक्षी ठरलेला पिंपरी-निगडी मेट्रो प्रकल्प वेगात पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. पुणे मेट्रोशी थेट जोडणारी ही मार्गिका सुरू झाल्यास शहरातील दळणवळणाला मोठी चालना मिळणार आहे.
सध्या पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौक दरम्यान मेट्रो मार्गिकेच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावर भक्ती-शक्ती ते आकुर्डी खंडोबा माळ पर्यंतच्या पिलर उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामात महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे.
दरम्यान, आकुर्डीतील जयहिंद कंपनी ते खंडोबा माळ या दरम्यान मेट्रो मार्गिकेवर पहिल्या ट्रॅकची उभारणी पूर्ण झाली आहे. यामुळे प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांना गती मिळाली असून, काम जलदगतीने पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पिंपरी-चिंचवड परिसरात वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतुकीची कोंडी गंभीर स्वरूप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो हा एक महत्त्वाचा व शाश्वत पर्याय ठरणार आहे. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पिंपरी-निगडी परिसरातील नागरिकांना पुणे शहराशी जलद, सुरक्षित आणि स्वस्त दळणवळणाचे साधन उपलब्ध होणार आहे.
प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन व कंत्राटदार कंपन्यांकडून काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याचे समजते. आगामी काही महिन्यांत या मार्गिकेवर आणखी ट्रॅक टाकण्याचे व स्टेशन उभारणीचे काम सुरू होणार आहे.
















