न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२५) :- औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे ठरणारे चाकण आणि पिंपरी-चिंचवड शहराला मेट्रोद्वारे जोडण्याचे स्वप्न आता वेगाने साकार होण्याच्या मार्गावर आहे. महा-मेट्रोकडून या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) नुकताच सादर करण्यात आला असून, फुगेवाडी येथे झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली.
या बैठकीला विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आयुक्त शेखर सिंह तसेच महा-मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हार्डीकर उपस्थित होते. वाढती लोकसंख्या, प्रचंड वाहतूक आणि औद्योगिक महत्त्व लक्षात घेता हा प्रकल्प तातडीने मंजूर व्हावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली. विशेष म्हणजे, भविष्यातील प्रवासी संख्येचा विचार करून डीपीआरमध्ये सुधारणा करून तीन डब्यांच्या ऐवजी सहा डब्यांच्या मेट्रो गाड्या ठेवाव्यात, अशी ठोस सूचना बैठकीत करण्यात आली.
या मार्गाचे एकूण अंतर ४२ किलोमीटर असून ३१ स्थानके प्रस्तावित आहेत. काही ठिकाणी बीआरटीएस आणि मेट्रोचे संयुक्त नियोजन होणार आहे. २०३१ पर्यंत ३.३८ लाख प्रवासी आणि २०६१ पर्यंत जवळपास ७.८० लाख प्रवासी या मार्गाचा लाभ घेतील, असा अंदाज आहे.
या मेट्रो प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड व चाकण औद्योगिक पट्ट्यातील दळणवळण अधिक सुलभ होऊन नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.












