न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२५) :- जुलै २०२५ मध्ये आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागातील सर्वात महत्वाचे पद रिक्त झाले आहे. गेले महिनाभर या पदावर कायमस्वरूपी नियुक्ती झालेली नसल्याने विभागातील कामकाज आणि निर्णय प्रक्रियेत शिथिलता जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य विषयक सर्वच जबाबदाऱ्या सध्या उपायुक्तांच्या खांद्यावर आल्या आहेत.
ही पोस्ट क्लास-वन दर्जाची असल्याने तिचे महत्व अधिकच आहे. सेवाजेष्ठतेनुसार या पदासाठी सात सहायक आरोग्याधिकारी इच्छुक आहेत. सेवाजेष्ठता, कार्यकाळ आणि कामगिरी यावरून या अधिकाऱ्यांमध्ये पदासाठी दावेदारी आहे. दरम्यान, ही पोस्ट मिळवण्यासाठी काही इच्छुकांनी थेट मंत्रालयाशी संपर्क साधल्याची, तर काहींनी आमदारांच्या माध्यमातून लॉबिंग सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे आरोग्य विभागात राजकीय हस्तक्षेप वाढल्याचे बोलले जात आहे. महापालिकेच्या प्रशासन विभागाकडून ही रिक्त जागा भरण्याला विलंब होत आहे. पुढील काही दिवसांत या महत्वाच्या पदावर कोणाची नेमणूक होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सदर रिक्त जागा लवकरच भरली जाईल. त्यासाठी प्रक्रिया सुरु आहे.
– मनोज लोणकर, सहआयुक्त, सामान्य प्रशासन विभाग…










