न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून विसर्जन सुरळीत व सुरक्षित पार पडावे, यासाठी महापालिकेकडून विशेष आरोग्य व्यवस्था करण्यात आली आहे. महत्त्वाच्या विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथके आणि सुसज्ज रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
या पथकांमध्ये वैद्यकीय अधिकारी, नर्स, वॉर्डबॉय, चालक व सफाई कर्मचारी यांचा समावेश असून, औषधसाठा व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत तातडीची सेवा मिळावी, यासाठी वैद्यकीय विभाग सतर्क आहे.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि सहायक अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ. किशोरी नलवडे आदी अधिकारी या मोहिमेचे समन्वयन करत आहेत.
प्राधिकरण तळे, वाल्हेकरवाडी, सुभाषनगर, वाकड, मोशी, चिखली, सांगवी, पिंपळे गुरव यांसह १० प्रमुख घाटांवर पथके तैनात करण्यात आली आहेत. “नागरिकांचा उत्सव आनंदी, सुरक्षित व निर्विघ्न व्हावा, हीच आमची प्राथमिकता आहे,” असे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.










