- आतापर्यंत फक्त दहा हरकती-सूचना दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ सप्टेंबर २०२५) :- महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेविषयी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि जनप्रतिनिधींकडूनही आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मंगळवार (दि. २) पर्यंत या प्रारूप रचनेवर एकूण दहा हरकती व सूचना महापालिकेकडे दाखल झाल्या आहेत.
२२ ऑगस्ट रोजी महापालिकेने ३२ प्रभागांमध्ये प्रभाग रचना जाहीर केली. या रचनेचे नकाशे संकेतस्थळासह महापालिका भवनातील पार्किंगमध्ये प्रदर्शित करण्यात आले आहेत. त्यावर आजवर आलेल्या दहा हरकती-सूचनांमध्ये नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचा भरणा असून, माजी महापौर मंगला कदम यांनीदेखील आपली भूमिका लेखी स्वरूपात सादर केली आहे.
हरकती व सूचना स्वीकारण्याची अंतिम मुदत गुरुवार (दि. ४) दुपारी तीन अशी निश्चित करण्यात आली आहे. या कालावधीनंतर कोणत्याही प्रकारच्या हरकती स्वीकृत केल्या जाणार नाहीत, अशी माहिती महापालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी दिली.
फेब्रुवारी २०१७ मध्ये असलेली प्रभाग रचना कायम ठेवण्यात आल्याने, हरकती-सूचनांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.















