- देशात नरेंद्र, राज्यात देवेंद्र व पक्षात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कणखर भूमिकेचा माझ्या विजयात मोठा वाटा
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०१९) :- मावळ लोकसभा मतदारसंघात मतदारांनी माझ्यावर पून्हा विश्वास टाकत मला देशाच्या संसदेत पून्हा काम करण्याची संधी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराने या मतदारसंघात शहरातून, जिल्ह्यातून व राज्याच्या कानाकोपऱ्यातून मला अडचणीत आणण्यासाठी फौजा मागवल्या व जंगजंग पछाडले. तरीही, मतदारांनी न डगमगता विकासाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे या मतदारसंघात दोन लाखांपेक्षाही अधिक मताधिक्य मिळवत मला मतदारांनी विजयी केले, असे बारणे म्हणाले.
मावळ लोकसभा मतदारसंघातील पुन्हा नवनिर्वाचित खा. बारणे यांनी महायुतीतील शिवसेना, भाजप, आरपीआय सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मावळमधील भाजप व शिवसेना आमदार व मतदार यांचे आभार प्रदर्शन व्यक्त करण्याकरीता आज बुधवार (दि. २९) रोजी पिंपरीत पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पिंपरी विधानसभेचे आ. गौतम चाबुकस्वार, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, उर्मिला काळभोर, प्रमोद कुटे, अनंत कोऱ्हाळे, रेखा दर्शिले आदी उपस्थित होते.
खा. बारणे म्हणाले की, महायुतीतील भारतीय जनता पक्षाने शिवसेनेपेक्षा दोन पाऊले पुढे जात माझ्या विजयासाठी खंबीरपणे व झटून काम केले. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्रात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेचा माझ्या विजयात मोठा वाटा आहे. तसेच महायुतीतील त्या सर्व नेतेमंडळीचे, आमदारांचे व कार्यकर्त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. या मतदारसंघात गेल्या पाच वर्षात मोठी विकासकामे केली आहेत. त्यामुळे मतदारांनीच ही लढाई प्रतिष्ठेची करीत, समोरच्या मातब्बर उमेदवाराचा पराभव करण्यासाठी निवडणूक यंत्रणा हाती घेतली व विकासाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्य मला मिळाले. या निवडणुकीत किती मताधिक्य मिळेल याचा आत्मविश्वास होताच. सहाही विधानसभा मतदारसंघात अपेक्षेपक्षाही जास्त मतदान झाले आहे. महायुतीच्या ताकदीचा अंदाज आम्हाला होता. त्याहीपेक्षा जास्त मतदान झाले. त्यामुळे मला मिळालेली ही मते माझ्या विकासाची व लोकांशी जोडलेली मते आहेत.
भाजपच्या चिंचवड मतदारसंघात काही नगरसेवकांनी कामच केले नाही, या प्रश्नाला उत्तर देताना बारणे म्हणाले की, या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा झंझावात होता. त्यामुळे कोणी काम केले किंवा नाही केले, याहीपेक्षा मतदारांनी मला पाठींबा दिला हे महत्वाचे आहे. आगामी विधानसभेबाबत जागा वाटपाचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे व भाजप नेते घेणार आहेत. मावळ मतदारसंघातील सहा मतदारसंघात ज्या कोणाला उमेदवारी मिळेल त्या सहाही विधानसभेत निष्ठेने काम करणार आहे.
मागील पाच वर्षात मतदारसंघातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. काही प्रश्नांचा मागील पाच वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. त्या प्रश्नांना तडीस नेण्याचा मनापासून प्रयत्न या पाच वर्षात करणार आहे. तसेच मेट्रोच्या कामाला गती देणे, पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पवना नदी प्रदूषण मुक्त करणे, रायगडमधील उल्हास नदी प्रदूषण मुक्त करणे, गड-किल्ले, लेण्यांचे संवर्धन करणे, मतदारसंघातील उद्योगधंद्यांना चालना देणे, उरण, पनवेल, कर्जत परिसरात लोकलच्या फे-या वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नागरिकांना घरे उपलब्ध करुन देण्यात येतील. याचबरोबर पाण्याचा प्रश्न मार्गी लावणार आहे. पीएमआरडीएअंतर्गत ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मावळातील दुर्गम भागात रस्ते, वीज पोहचविली आहे. ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सोडविणार असल्याचेही बारणे यांनी यावेळी सांगितले.











