- अतिक्रमणविरोधी मोहीमेत तब्बल ४० अतिक्रमणे हटवली..
- पीएमआरडीए, नगरपरिषद व एनएचएआयची संयुक्त कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ सप्टेंबर २०२५) :- चाकण एमआयडीसी परिसरातील वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या दूर करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पावले उचलली आहेत. बुधवारी (दि.१०) नगरपरिषद, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि पोलिसांच्या संयुक्त बंदोबस्तात अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू करण्यात आली. या मोहिमेत चाकण-तळेगाव चौक ते आंबेठाण चौक, एकतानगर रस्त्याच्या कडेला असलेली ४० अतिक्रमणे हटवण्यात आली.
गेल्या आठवड्यात पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार पूर्वसूचना देऊनही अतिक्रमणधारकांनी रस्ते मोकळे केले नाहीत, म्हणून प्रत्यक्षात कारवाईचा धडाका लावण्यात आला.
या कारवाईमुळे पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असून दोन्ही बाजूंनी साडेबावीस मीटरच्या आत असलेली अतिक्रमणे काढून टाकली जात आहेत.
यावेळी एनएचएआयचे सहकार्यकारी अभियंता दिलीप शिंदे, पीएमआरडीएचे रवींद्र रांजणे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सोळंके, वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व अतिक्रमण निर्मूलन पथकातील कर्मचारी उपस्थित होते.















