- जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांच साकडं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू (दि. ११ सप्टेंबर २०२५) :- श्रीक्षेत्र देहुगाव-देहूरोड हा प्रमुख रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत दुरावस्थेत असून नागरिक व भाविकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. झेंडेमळा, हगवणे मळा, काळोखे मळा तसेच देहूरोड ते देहुगावपर्यंतच्या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
संत तुकाराम महाराजांच्या कार्याशी निगडित देहुगाव येथे राज्यभरातून भाविक येतात. लाखो वारकरी वर्षभर या मार्गाने दर्शनासाठी ये-जा करतात; मात्र रस्त्याच्या खड्यांमुळे त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक ग्रामस्थ व पंचक्रोशीतील नागरिक अनेकदा या समस्येबाबत आवाज उठवत असले तरी तोडगा निघालेला नाही.
रस्त्याच्या डागडुजीसाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाने नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने अडथळा दूर झाला आहे. ग्रामस्थांच्या मागणीबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी संबंधित विभागाशी समन्वय साधून रस्ता दुरुस्तीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.













