न्यूज पीसीएमसी नेटवर्क
बिजलीनगर (सोमवार, दि. २२ सप्टेंबर २०२५) :- येथील नागसेननगर झोपडपट्टीत धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाची क्रूर हत्या करण्यात आली. या हल्ल्यात तरुणाचा हात तोडून शरीरापासून वेगळा करण्यात आला. ही घटना दुपारी साडेतीनच्या सुमारास उघडकीस आली.
नागसेननगर झोपडपट्टीतील वैभव थोरात (वय २५) असे मृताचे नाव आहे. त्याच्यावर धारदार कोयत्याने डोकं, हात, पाय आणि छातीत वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये योगेश गायकवाड (वय २५), अनिल बनसोडे (वय १९), महेश कोळी (वय १९) व शिवम वाळुंज (वय १६) यांचा समावेश आहे. वैभव व योगेश यांच्यातील पूर्वीच्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे.
सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती चिंचवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश बांगर यांनी दिली.













