- कार्यकर्त्यांना दिला एकजुटीचा संदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड, मंगळवार, (दि. २३ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेला वेग देण्यास सुरुवात केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी शहरात जनसंवाद साधत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमातून राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीची रणनिती स्पष्ट केली आहे.
या संवाद मेळाव्यात पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, मोशी आदी भागांतील जवळपास ४ हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. स्थानिक प्रश्नांमध्ये रस्त्यांची दुरुस्ती, पाणीपुरवठा, वाहतुकीची कोंडी, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सुविधा यांचा विशेष उल्लेख झाला. नागरिकांनी थेट अजित पवार यांच्यासमोर आपल्या अडचणी मांडल्या.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “हे माझे शहर असून विकासाची जबाबदारी माझ्यावर आहे. शहरात आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांसाठी ठोस निर्णय घेतले जाणार आहेत. महापालिकेत सत्ता आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करणे आवश्यक आहे.”
कार्यक्रमात अनेक समाजघटकांतील कुटुंबांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे पक्षाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र होते. पवार यांनी नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांना संघटन मजबूत करण्याचे आवाहन केले.
या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यास सुरुवात केली असून, आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाने जोरदार तयारी केली असल्याचे दिसून आले.













