- मेट्रो मार्गावरून शहरात चर्चेला उधाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ सप्टेंबर २०२५) :- निगडी ते चाकण प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपूल अडथळा ठरत आहे. त्यामुळे हा पूल पाडणार का, या चर्चेला शहरात उधाण आले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पूल तोडून मेट्रो मार्ग नेण्याचा पर्याय सुचवल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विषयावर बैठकीत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “भोसरी पूल पाडण्याशिवाय इतर पर्याय आहेत का, ते तपासा. जास्तीत जास्त ठिकाणाहून मेट्रो मार्ग गेला पाहिजे. मात्र यासाठी वेळ वाया घालवू नका, डीपीआर तातडीने तयार करा.”
दरम्यान, नागरिकांमध्ये या विषयावर दोन गट पडले आहेत. काहींचे म्हणणे आहे की मेट्रो मार्गासाठी पूल तोडणे भाग आहे, तर काहीजण विद्यमान पूल कायम ठेवून दुसरा मार्ग शोधण्याची मागणी करत आहेत. यामुळे भोसरी परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
याच बैठकीत अजित पवार यांनी निगडीहून रुपीनगर, तळवडे, आयटी पार्कमार्गे चाकणपर्यंत नवा मेट्रो मार्ग तयार करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे शहरातील अधिकाधिक भागांतून मेट्रो सुविधा उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.
मेट्रोचा विस्तार हा वाहतूक कोंडीवरील महत्त्वाचा उपाय मानला जात असला तरी भोसरी उड्डाणपूल पाडायचा की पर्याय शोधायचा, यावर पुढील निर्णय अवलंबून राहणार आहे. त्यामुळे सध्या “भोसरी पूल पाडणार का?” हा प्रश्न शहरात चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे.













