न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २७ सप्टेंबर २०२५) :- शालेय विद्यार्थ्यांची धोकादायक व अवैध पद्धतीने ने-आण करणाऱ्या वाहनांवर पिंपरी चिंचवड वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्त विशेष मोहिम राबवून मोठी कारवाई केली.
दि. २६ सप्टेंबर रोजी पिंपरी, भोसरी, चाकण, वाकड, निगडी आणि हिंजवडी या हद्दीत पोलिस व आरटीओच्या वायुवेग पथकांनी कारवाई केली. या मोहिमेत एकूण १७० बसेस तपासण्यात आल्या, त्यापैकी ७७ बसांवर नियमभंग केल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच १५७ व्हॅन आणि रिक्षा तपासून १२८ वाहनांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईतून एकूण ७,६९,७५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
ही मोहीम पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली, वाहतूक विभागाचे उपायुक्त विवेक पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली.
या कारवाईमुळे शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला असून पुढील काळात अशा मोहिमा अधिक कठोरपणे राबविण्यात येतील, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले.












