न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत बांधकाम अतिक्रमण विभागाने प्रभाग क्रमांक ३० मधील दापोडी व फुगेवाडी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करत एकाच दिवशी तब्बल सहा हजार पाचशे स्क्वेअर फूट बांधकाम जमीनदोस्त केले.
सकाळी दहा वाजता दापोडी येथे मंत्री कॉम्प्लेक्सलगत उभारण्यात आलेल्या दुमजली अनधिकृत बांधकामावर पहिली कारवाई करण्यात आली. यानंतर दुपारी बारा वाजता फुगेवाडी आझाद चौकात सुरू असलेल्या चार मजली अनधिकृत इमारतीवर मोठी कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर जवळच असलेल्या आणखी एका दुमजली बांधकामावरही कारवाई करण्यात आली. त्यामुळे एका दिवसात तीन अनधिकृत बांधकामांवर कारवाई झाली.
सदर कारवाई ह क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त पूजा दूधनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यावेळी अतिक्रमण विभागाचे कनिष्ठ अभियंता संदीप हजारे, बीट निरीक्षक रोहन कांबळे, शाबुद्दीन बागवान, शुभांगी चंदनकर, प्रफुल्ल भोकरे, राजू कांबळे, सूरज माने आदी उपस्थित होते.
कारवाईदरम्यान दापोडी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक, तीन पोलिस अंमलदार, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १८ जवान, मनपाचे १४ मजूर, तीन ट्रॅक्टर ब्रेकर आणि एक जेसीबी यांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली. ऐन उत्सवाच्या काळात कोणतीही तमा न बाळगता अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येत असल्याने परिसरात चर्चा रंगली आहे.
















