न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी, (दि. ११ ऑक्टोबर २०२५) :- राज्यस्तरीय आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. आरोग्य सेवा आयुक्तालयामार्फत जाहीर करण्यात आलेल्या जुलै व ऑगस्ट २०२५ च्या आरोग्य कार्यक्रमांच्या (MoH) रँकिंगमध्ये महापालिकेने सलग पाचव्यांदा राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये अव्वल स्थान मिळवले.
राज्यातील २७ महानगरपालिकांना मागे टाकत पिंपरी-चिंचवडने जुलैमध्ये ४४.८५ आणि ऑगस्टमध्ये ४३.०१ गुण मिळवून प्रथम क्रमांक कायम ठेवला. मातृत्व व बाल आरोग्य, लसीकरण, क्षयरोग व डेंग्यू नियंत्रण, असंसर्गजन्य आजारांवरील उपाय, तसेच ई-औषधी आणि आयुष्मान भारत योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत महापालिकेने उल्लेखनीय यश मिळवले आहे.
अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले, “ही रँकिंग आपल्या कार्यसंस्कृतीची पावती आहे.” तर डॉ. लक्ष्मण गोफणे, वैद्यकीय अधिकारी, यांनी म्हटले की “आरोग्य कर्मचाऱ्यांपासून तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत सर्वांचा सहभाग या यशामागे आहे.” महापालिकेच्या या सलग पाचव्या यशामुळे शहराच्या आरोग्य सेवेत सातत्यपूर्ण उत्कृष्टतेचा ठसा उमटला आहे.