न्यूज पीसीएमसी नेटवर्क
हिंजवडी, (दि. ११ ऑक्टोबर २०२५) :- हिंजवडी-माण रोडवरील पांडवनगर चौकात शुक्रवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणीचा जागीच मृत्यू झाला. बेदरकारपणे चालविलेल्या मिक्सर ट्रकने दिलेल्या धडकेत हा अपघात घडला.
अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव भारती राजेशकुमार मिश्रा (३०, रा. थेरगाव) असे असून त्या व्यवसायाने सौंदर्यविशारद होत्या. त्या आपल्या ग्राहकाकडे होम सर्व्हिससाठी जात असताना मिक्सरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेच्या तीव्रतेमुळे भारती यांचा तोल जाऊन त्या मिक्सरच्या चाकाखाली सापडल्या आणि जागीच प्राण गमावले.
मिक्सरचालक मोहम्मद अब्बास अल्ताफ (२५, रा. चांदे, ता. मुळशी) हा अपघातानंतर वाहन तसंच सोडून पसार झाला होता. मात्र, हिंजवडी पोलिसांनी तत्पर कारवाई करत काही तासांतच त्याला अटक केली. मृत महिलेचे पती राजेशकुमार मिश्रा यांनी फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.