- संत तुकारामनगरमधील घटना; दोन दुचाकींचे नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
नेहरूनगर, पिंपरी (दि. १२ ऑक्टोबर २०२५) :- संत तुकाराम नगर परिसरातील यशवंत चौकाजवळ शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास एक डंपर उलटल्याची घटना घडली. अपघातात शेजारील गॅरेजसमोर उभ्या दोन दुचाकींचे किरकोळ नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यामध्ये दुचाकीस्वार वाचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर चालक स्वप्निल काकडे हा यशवंत चौकातून जात असताना रस्त्यावर असलेल्या भुयारी वाहिनीचे झाकण तुटल्याने अपघात झाला. अचानक मागील चाक झाकणात अडकल्याने डंपरचा तोल गेल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या घटनेमुळे मोठा अनर्थ टळला. नंतर क्रेनच्या साहाय्याने चेंबरमध्ये अडकलेला डंपर बाहेर काढण्यात आला.
या ठिकाणी असलेले भुयारी वाहिनीचे चेंबरचे झाकण तुटलेले आहे. या धोकादायक परिस्थितीबाबत शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रमुख राजेश वाबळे यांनी वारंवार तक्रार केली होती.
पिंपरीजवळील संत तुकारामनगर येथील यशवंत चौकाजवळ शनिवारी अंतर्गत भुयारी वाहिनीचे चेंबरचे झाकण तुटल्यामुळे डंपर अडकून उलटला.
स्थानिक नागरिकांनीही महापालिकेच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला आहे. चौकातील तुटलेली झाकणे, असमान रस्ते आणि धोकादायक खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका कायम असल्याची तक्रार नागरिकांनी केली. येथील चेंबरची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.