न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १२ ऑक्टोबर २०२५) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी शुक्रवारी स्वीकारला. पदभार स्विकारल्यानंतर घेतलेल्या विभागप्रमुखांच्या बैठकीत त्यांनी शहरातील शिस्त आणि प्रशासनातील जबाबदारी यावर भर दिला.
हर्डीकर म्हणाले, “पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिक, गोरगरिबांना कोणताही त्रास होता कामा नये. पदपथावर उभी केलेली वाहने, मोटारी अगोदर उचलाव्यात, त्यानंतरच फेरीवाल्यांच्या हातगाड्यांवर कारवाई करावी. अतिक्रमण कारवाईत कोणताही दुजाभाव होता कामा नये.”
तसेच त्यांनी रस्ते आणि पदपथांवर कचरा साचू नये, जिथे कचरा दिसेल तेथील संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना दिल्या. “पाणीपुरवठा विस्कळीत होऊ देऊ नका. नागरिकांना पुरेसा आणि स्वच्छ पाणीपुरवठा मिळाला पाहिजे. नवीन प्रकल्प आणू नयेत,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, सह आयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मकरंद निकम आणि आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे उपस्थित होते.
दरम्यान, आयुक्त शेखर सिंह यांच्या बदलीनंतर हर्डीकर यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला असला तरी, पिंपरी-चिंचवडला नवे आयुक्त म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.