- अतिवृष्टीग्रस्त भागातील ६०० विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी उमेद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
खोंदला, धाराशिव (दि. १६ ऑक्टोबर २०२५) :- “दोस्ती फाउंडेशन भोसरी, पुणे” तर्फे हसेगाव, सात्रा, खोंदला आणि पाथर्डी परिसरातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील एकूण ६०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किट वाटण्यात आले.
“आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो” या भावनेतून राबविलेल्या या उपक्रमामुळे पूरग्रस्त विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा शिक्षणाची उमेद जागवली गेली आहे.
या सामाजिक कार्यात फाउंडेशनचे अध्यक्ष भारत भुजबळ, पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, संजय सातव, संजय भोसले, माणिक पडवळ, मच्छिंद्र बुरडे, महेश लोंढे, विशाल बुरडे आणि अमित सुतार यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाथर्डीचे उद्योजक शरद सावंत आणि युवासेना तालुका प्रमुख पंडित देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. गावकऱ्यांनी आणि शिक्षक वर्गाने या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत दोस्ती फाउंडेशनच्या सामाजिक बांधिलकीचे अभिनंदन केले.













