- आ. जगतापांचे संबंधित यंत्रणांना समन्वयाने काम करण्याचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. १६ ऑक्टोबर २०२५) :- वाकड, पुनावळे आणि मामुर्डी परिसरातील सुरू असलेल्या अंतर्गत व डिपी रस्त्यांच्या कामांना युध्दपातळीवर गती देण्याचे स्पष्ट निर्देश चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. या भागातील नागरिकांना गेल्या वर्षभरापासून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, रस्ते काम पूर्ण झाल्यानंतर दिलासा मिळणार आहे.
आमदार जगताप यांनी बुधवारी (दि. १५ ऑक्टोबर) भाजप पदाधिकारी, नगरसेवक आणि संबंधित विभागीय अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी आवश्यक त्या ठिकाणी डांबरीकरण, अतिक्रमण हटविणे, सर्विस लाईन शिफ्ट करणे आणि वाहतूक मार्ग मोकळा करण्याचे निर्देश दिले. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वाहतूक विभाग आणि महावितरण या सर्व यंत्रणांनी समन्वय साधून काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेशही दिले.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर सेवा रस्त्याचे काम जलद गतीने सुरू झाले आहे. भुजबळ चौक ते भूमकर चौकापर्यंतचे काम पूर्ण झाले असून, उर्वरित रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे,” असे आमदार जगताप यांनी सांगितले.













